ताज्या घडामोडी

मराठा आरक्षण : मूक आंदोलनाला सुरूवात; लोकप्रतिनिधी मांडतायेत भूमिका

प्रबोधिनी न्युज नेटवर्क टीम

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यात या निकालाचे पडसाद उमटत असून, पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पहिलं आंदोलन कोल्हापूरात भर पावसात सुरू झालं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.

सुरुवातीपासूनच आंदोलन न करण्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची तलवार उपसली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. हे मूक आंदोलन असणार असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं. आज पहिलं आंदोलन होत असून, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) भूमिका मांडणार आहे.

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केलं. आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली.

“हा लढा मराठा आरक्षणासाठी निर्णायक असून, लोकप्रतिनिधी ताकतीने उतरणार आहे. सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक व्हायला हवी”, असं मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर “या आंदोलनात राजकारण होऊ नये. पंतप्रधानांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळले आहे. त्यात समन्वय कायम ठेवून हा प्रश्न मिटवावा,’ असं आमदार विनय कोरे म्हणाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील यांनी भूमिका मांडल्या. इतर लोकप्रतिनिधी आपल्या भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र संभाजीराजे यांना दिलं.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन करत महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्याच्या काळातच त्यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. संपूर्ण दौरा झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर राज्य सरकारला कृती कार्यक्रम निश्चित करण्याचं आवाहन करत आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »