ताज्या घडामोडीसामाजिक

शेतकऱ्यांनी फवारणी करतेवेळी सुरक्षा किटचा वापर करावा : डॉ. उदय पाटील

किटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना

कु.किरण जाधव
मुख्य उपसंपादक
चंद्रपूर

चंद्रपूर- दि. 27 ऑगस्ट : विषारी कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्याने विषबाधा होऊ शकते. तेव्हा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना संबंधित कीटकनाशकांच्या प्रभावांची व लक्षणांची माहिती असणे आवश्‍यक आहे. किटकनाशकांची फवारणी करतांना सर्व शेतकरी, भुधारक, शेतमालक व शेतमजुर यांनी हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, ॲप्रॉन, बुट इत्यादी प्रतिबंधात्मक किटचा वापर कटाक्षाने करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

किटकनाशकाची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असतांना शेतमजुरांना संरक्षक किट पुरवून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्याची नैतिक व कायदेशिर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्याअनुषंगाने शेतमालकाने नैतिक व कायदेशिर जबाबदारी पुर्ण पाळावी. जेणेकरुन, संभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.

शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करतांना स्वत:ला, घरातील कुटूंबियांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीकोनातुन प्रथमोपचाराचे साहित्य शेतात उपलब्ध ठेवावे. पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिणण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुध्द दिशेला तोंड करुन किटकनाशकाची फवारणी केल्यास किटकनाशकाचा फवारा मोठ्या प्रमाणात शरिरावर पडुन शरिरात विष भिणण्याची शक्यता असते.

पिकावर किटकनाशकाची फवारणी करतांना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. किटकनाशकांपैकी ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरीन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन इत्यादी) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्या वेळी आवश्यक ती खबरदारी न चुकता घेण्यात यावी.

किटकनाशकाची फवारणी करतांना शेतमालकाला स्वत:ला विषबाधा झाल्यास त्याने तात्काळ प्रथमोपचार घ्यावेत. तसेच, शेतमजुर अथवा अन्य व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार करावेत. प्रथमोपचारानंतर स्वत: अथवा संबंधित शेतमजुराला, व्यक्तीला तात्काळ जवळच्या शासकिय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावेत.

किटकनाशकाची फवारणी करतांना शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी फवारणी दरम्यान अथवा फवारणी पुर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजुराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशिर जबाबदारी शेतमालकाची आहे. शेतमालकाने किटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतमजुराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातुन किमान शारिरीक तपासणी करुन घ्यावी.

किटकनाशक फवारणी संदर्भात शेतकरी व शेतमजुरांचे प्रबोधन वृत्तपत्रे, दुरदर्शन, आकाशवाणी, शेतकरी मेळावे, घडीपत्रिका, भित्तीपत्रे, प्रशिक्षण शेतकरी मासिक, पिकावरील किडरोग व सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत किड सर्वेक्षण, किड नियंत्रक, कृषि विज्ञान केंद्रे, भ्रमणध्वनीवरील एसएमएस, दवंडी इत्यादी माध्यमाव्दारे सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागरण मोहिम हाती घ्यावी.

जनजागरण मोहीम राबविण्याकरीता कृषि विद्यापिठातील शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, किटकनाशक कंपनी असोसिएशन, किटकनाशक कंपन्या, शासकिय व खाजगी संबंधित संशोधन संस्था, किटकनाशक कंपन्यांचे डिलर्स व विक्रेते यांचे लोक प्रतिनिधींची मदत घेण्यात यावी.

शेतमालकाने, माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, तहसिलदार,पंचायत समितीचे कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »