क्राइम

मनपा तर्फे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘फिरते विसर्जन कुंड’

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर

चंद्रपूर २३ ऑगस्ट – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज असून, उत्‍सवादरम्‍यान मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्‍याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ‘फिरते विसर्जन कुंड’ आज सुरु करण्यात आले. महापौर राखी कंचर्लावार यांच्या घरच्या गणेशमुर्तीचे विसर्जन या विसर्जन कुंडात करून हा विसर्जन रथ लोकसेवेत रुजू करण्यात आला.

शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने उत्सवाप्रसंगी निर्बंधांचे पालन करावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता श्री गणेशमूर्ती विसर्जनप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपातर्फे २० कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेमध्ये अधिक भर घालत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मूर्ती संकलनासाठी ‘फिरते विसर्जन कुंड’ कार्यरत ठेवण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने ‘फिरते विसर्जन कुंड’ कार्यरत असणार असून हे वाहन शहरात फिरून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन करतील. याकरीता नागरिकांना ७३५०९५९५२९, ९७६७३३९१५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. फोन केल्यास विसर्जन रथ आपल्या घरापर्यंत येईल, तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विसर्जनापूर्वीची निरोपाची आरती घरीच करून आपल्या श्रीगणेशमूर्ती महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन वाहनावरील स्वयंसेवकांकडे द्याव्यात असे आवाहन आहे.
यावर्षी संपूर्ण मानवजातीवरच कोरोनाचे विघ्न आले आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव शक्यतोवर कौटुंबिक पद्धतीने, कौटुंबिक वातावरणात साजरा करून हे कोरोनाचे विघ्न दूर करायचे आहे. शक्यतोवर हा सण फक्त घरीच करायचा आहे. सार्वजनिक रूपात सण साजरा करणे टाळावे. गणपती दीड दिवसाचा असेल, पाच दिवसाचा असेल अथवा दहा दिवसाचा असेल, शहरातील प्रत्येकाने गणेशाचे विसर्जन घरी, कृत्रिम टाक्यांत अथवा फिरत्या विसर्जन कुंडातच करावे – महापौर राखी कंचर्लावार.
श्रीगणेशोत्सवाचा उत्साह कायम राखून प्रत्येक नागरिकाने आरोग्यभान राखावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका राबवित असलेल्या विविध सोयीसुविधांचा लाभ घ्यावा आणि आपले शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योध्द्याची भूमिका साकारावी असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »